माझे ऑफिस आहे तिसऱ्या मजल्यावर. त्याच्या खिडकीतून लांबच लांब पसरलेले आकाश दिसते, अगदी टेकडीपर्यंतआणि त्याच्या खाली, आमच्या इमारतीला लागूनच आहे एक वस्ती, तशी साधीच. गरीब लोकांची, दोन वेळा जेवून पोट भरणारे असतील.
कधी कधी त्या खिडकीत संध्याकाळी उभे राहिले की खूप सारे काही रंगबेरंगी आहे असे वाटू लागते. त्या वस्तीला एका बाजूला पत्र्यची घरे आहेत एका ओळीत, आणि मग बराचसा भाग तसा ओसाड आहे. तिथे बरीच झाडे-झुडपे , गवत वाढलेले असते.
आणि त्या घराच्या मागची बाजूला मोठ-मोठाली झाडे आहेत, वडाची, मोहाची आणि कदाचित पिंपळाची. कधी खिडकीतून पहिले तर ती हिरवीगार झाडं एकदम उठून दिसतात, त्या आभाळावर.
त्या ओसाड जागेत बाजूला एक पाण्याचे टाके आहे आणि मधोमध एक बंद पडलेला गुड्स कॅरिअर वाला ट्रक. त्यात बरेच वाया गेले समान टाकलेले आहे. मध्ये त्यावर IPL चालू असताना पुणे वोरिअर चा झेंडा फडकत होता. तो ट्रक सोडून काही अंतर मागे वीटा लावलेल्या आहेत, लावलेल्या म्हणण्यापेक्षा जुन्या वीटभट्टीचे अवशेष असल्यासारख्या पडून आहेत. कारण त्यावर खूप सारे शेवाळे चढलेले असते, आणि ऋतुमानानुसार त्याचे रंग पण बदलत असतात. ट्रक जवळ पाण्याची बरीच भांडी भरून ठेवलेली असतात आणि पुढे एक हातपंप पण आहे.. तिथे कोणी ना कोणी सारखे येत असते. आणि त्याला खालीवर करत असते.
त्या वस्तीला प्राणीसंख्या पण कमी नाहीये. हळूच एक दोन बोके उड्या मारण्याच्या तयारीत एखाद्या पत्र्यावर बसलेले असतात किवा भांडत असतात; त्या बोक्यांना वरून बघत राहिले तर त्यांच्या सूक्ष्म आणि स्थूल हालचाली कळून येतात. तीन -चार गावरान कुत्री त्या ओसाड जागेत उगीच फिरत असतात, कधी एखादे कुत्रं त्या विटांवर बसलले असते, पावसाळ्यात ते हिरव्या सिह्नासनावर बसल्यासारखे वाटते. कधी कधी त्यांच्या भांडणाचा आवाज वर पर्यंत येत असतो आणि खिडकी पण बंद करावी लागते. मधूनच कधीतरी एखादी गाय पण दिसते. संध्याकाळी कधी बगळ्यांची एखादी माळ तिच्यावरून उडत जात असते आणि पावसाळ्यात ती ओसाड जागा अनेक गवती फुलांनी भरून जाते आणि वरून पहिले की अनेक फुलपाखरे आणि पक्षी त्यावर रुंजी घालताना दिसतात.
त्या वस्तीतल्या मुलांचे खेळ पण ऋतू नुसार बदलत असतात. उन्हाळा असेल तेव्हा तिथे ओसाडावर क्रिकेट चालू असते, किवा ट्रकची चाके काठीने फिरवत मुले फिरत असतात. जसा पावसाळा सुरु होतो, वस्ती रंग पालटते आणि मुले त्यांचे खेळ बदलतात. पावसाळ्यात झाडावर सूर पारंब्यांचा खेळ चालू असतो. मुलं-मुली उंच उंच झोके घेत असतात, वर त्या उंच आभाळाकडे बघत. किंवा कुठेतरी साचलेल्या पाण्यात उड्या मारत असतात. कधी त्या मोडलेल्या ट्रकवर पण दिसतात. त्या मुलांचे कपडे फार काही छान असतात असे नाही, पण खेळताना आणि दंगा करताना ती छान वाटतात, त्या हिरवाईत अजून जरा भरच पडते. त्या वस्तीतल्या बायका पण कधी कधी दुपारी बाहेर बसून गप्पा मारतात, नाहीतर त्या पाण्याच्या टाक्याजवळ लगबग काहीतरी करत असतात. मधून एखादा सण असेल तर तिथे रेकॉर्डस पण लावलेल्या असतात.
कधी कंटाळा आला की मी त्या खिडकीत उभी राहते , वरून बघताना असे वाटते की त्या वस्तीचे असे स्वतःचे एक विश्व आहे, कदाचित ते तिथल्या लोकांना पण माहित नाहीये. तिथे सतत काहीतरी लगबग चालू असते, प्राण्यांची, मुलांची , बायका- माणसांची. कुठले ना कुठले आवाज सुरु असतात, भुंकण्याचे, हसण्याचे, गाण्याचे आणि त्याचबरोबर एक आवाज असतो तिथल्या निसर्गाच्या लयीचा. वस्तीचे चित्र ऋतूनुसार बदलते, उन्हाळ्यातली वस्ती उन्हाने तापून निघाली तरी ती तेवढीच छान वाटते जेवढी ती पावसाने न्हाहून निघते तेव्हासुद्धा. तिथे एक लय आहे, तिथली ती ओसाडाची जागा आणि मोठाली झाडे जशी बदलतात तसे ते लोकही बदलतात. ते त्या बदलला आपलेसे करतात. कदाचित म्हणूनच ती वस्ती कधीही बघितली तरी नवीनच वाटते, नव्याकोऱ्या अनुभावासारखी.
भले त्या वस्तीतल्या घरांवर डीश टीवी च्या तबकड्या लावल्या असतील , भलेही ती मोठ्याला इमारतींनी झाकली गेली असेल, पण वरून बघितले तर, सकाळपासून रात्रीपर्यंत त्या खिडकीतून रंग बदलणाऱ्या आकाशाचे प्रतिबिंब तिच्यावर पडलेले असते.
त्या वस्तीच्या रंगबेरंगी कोलाजातून निसर्गच लयबद्धपणे दाखवत असतो खूण आपल्या अस्तित्वाची.