Wednesday, September 5, 2012

एक वस्ती



माझे ऑफिस आहे तिसऱ्या मजल्यावर. त्याच्या खिडकीतून लांबच लांब पसरलेले आकाश दिसते, अगदी टेकडीपर्यंतआणि त्याच्या खाली, आमच्या इमारतीला लागूनच आहे एक वस्ती, तशी साधीच. गरीब लोकांची, दोन वेळा जेवून पोट भरणारे असतील.
कधी कधी त्या खिडकीत संध्याकाळी उभे राहिले की खूप सारे काही रंगबेरंगी आहे असे वाटू लागते. त्या वस्तीला एका बाजूला पत्र्यची घरे आहेत एका ओळीत, आणि मग बराचसा भाग तसा ओसाड आहे. तिथे बरीच झाडे-झुडपे , गवत वाढलेले असते.
आणि त्या घराच्या मागची बाजूला मोठ-मोठाली झाडे आहेत, वडाची, मोहाची आणि कदाचित पिंपळाची.  कधी खिडकीतून पहिले तर ती हिरवीगार झाडं एकदम उठून दिसतात, त्या आभाळावर.
त्या ओसाड जागेत बाजूला एक पाण्याचे टाके आहे आणि मधोमध एक बंद पडलेला गुड्स कॅरिअर वाला ट्रक. त्यात बरेच वाया गेले समान टाकलेले आहे. मध्ये त्यावर IPL चालू असताना पुणे वोरिअर चा झेंडा फडकत होता. तो ट्रक सोडून काही अंतर मागे  वीटा लावलेल्या आहेत, लावलेल्या म्हणण्यापेक्षा जुन्या वीटभट्टीचे अवशेष असल्यासारख्या पडून आहेत. कारण त्यावर खूप सारे शेवाळे चढलेले असते, आणि ऋतुमानानुसार त्याचे रंग पण बदलत असतात.  ट्रक जवळ पाण्याची बरीच भांडी भरून ठेवलेली असतात आणि पुढे एक हातपंप पण आहे.. तिथे कोणी ना कोणी सारखे येत असते. आणि त्याला खालीवर करत असते.
त्या वस्तीला प्राणीसंख्या पण कमी नाहीये. हळूच एक दोन बोके उड्या मारण्याच्या तयारीत एखाद्या पत्र्यावर बसलेले असतात किवा भांडत असतात; त्या बोक्यांना वरून बघत राहिले तर त्यांच्या सूक्ष्म आणि स्थूल हालचाली कळून येतात. तीन -चार गावरान कुत्री त्या ओसाड जागेत उगीच फिरत असतात, कधी एखादे कुत्रं त्या  विटांवर बसलले असते, पावसाळ्यात ते हिरव्या सिह्नासनावर बसल्यासारखे वाटते. कधी कधी त्यांच्या भांडणाचा आवाज वर पर्यंत येत असतो आणि खिडकी पण बंद करावी लागते. मधूनच कधीतरी एखादी गाय पण दिसते. संध्याकाळी कधी बगळ्यांची एखादी माळ तिच्यावरून उडत जात असते आणि पावसाळ्यात ती ओसाड जागा अनेक गवती फुलांनी भरून जाते आणि वरून पहिले की अनेक फुलपाखरे आणि पक्षी त्यावर रुंजी घालताना दिसतात.
त्या वस्तीतल्या मुलांचे खेळ पण ऋतू नुसार बदलत असतात. उन्हाळा असेल तेव्हा तिथे ओसाडावर क्रिकेट चालू असते, किवा ट्रकची चाके काठीने फिरवत मुले फिरत असतात. जसा पावसाळा सुरु होतो, वस्ती रंग पालटते आणि मुले त्यांचे खेळ बदलतात. पावसाळ्यात झाडावर सूर पारंब्यांचा खेळ चालू असतो. मुलं-मुली उंच उंच झोके घेत असतात, वर त्या उंच आभाळाकडे बघत. किंवा कुठेतरी साचलेल्या पाण्यात उड्या मारत असतात. कधी त्या मोडलेल्या ट्रकवर पण दिसतात. त्या मुलांचे कपडे फार काही छान असतात असे नाही, पण खेळताना आणि  दंगा करताना ती छान वाटतात, त्या हिरवाईत अजून जरा भरच पडते. त्या वस्तीतल्या बायका पण कधी कधी दुपारी बाहेर बसून गप्पा मारतात, नाहीतर त्या पाण्याच्या टाक्याजवळ लगबग काहीतरी करत असतात. मधून एखादा सण असेल तर तिथे रेकॉर्डस पण लावलेल्या असतात.
कधी कंटाळा आला की मी त्या खिडकीत उभी राहते , वरून बघताना असे वाटते की त्या वस्तीचे असे स्वतःचे एक विश्व आहे, कदाचित ते तिथल्या लोकांना पण माहित नाहीये. तिथे सतत काहीतरी लगबग चालू असते, प्राण्यांची, मुलांची , बायका- माणसांची. कुठले ना कुठले आवाज सुरु असतात, भुंकण्याचे, हसण्याचे, गाण्याचे आणि त्याचबरोबर एक आवाज असतो तिथल्या निसर्गाच्या लयीचा. वस्तीचे चित्र ऋतूनुसार बदलते, उन्हाळ्यातली वस्ती उन्हाने तापून निघाली तरी ती तेवढीच छान वाटते जेवढी ती पावसाने न्हाहून निघते तेव्हासुद्धा.  तिथे एक लय आहे, तिथली ती ओसाडाची जागा आणि मोठाली झाडे जशी बदलतात तसे ते लोकही बदलतात. ते त्या बदलला आपलेसे करतात. कदाचित म्हणूनच ती वस्ती कधीही बघितली तरी नवीनच वाटते, नव्याकोऱ्या अनुभावासारखी.
भले त्या वस्तीतल्या घरांवर डीश टीवी च्या तबकड्या लावल्या असतील , भलेही ती मोठ्याला इमारतींनी झाकली गेली असेल, पण वरून बघितले तर,  सकाळपासून रात्रीपर्यंत त्या खिडकीतून रंग बदलणाऱ्या आकाशाचे प्रतिबिंब तिच्यावर पडलेले असते.
त्या वस्तीच्या रंगबेरंगी कोलाजातून निसर्गच लयबद्धपणे दाखवत असतो खूण आपल्या अस्तित्वाची. 

Saturday, July 30, 2011

अजूनही काही बाकी आहे

अजूनही काही बाकी आहे
ते क्षण सोनेरी
ओंजळीतून सुटलेले
निसटलेले
त्यांची किरणे होणे बाकी आहे

धूसर धूसर दिशा
कधी भटकलेल्या
कधी भेटलेल्या
कधी दुरूनच पाहिलेल्या
त्यांची वाट होणे बाकी आहे

तेच रस्ते , तीच गावे
तेच चेहरे ओळखीचे
आपलेच एक
अनोळखी अस्तित्व शोधणे बाकी आहे

कधी राहून गेलेल्या
कधी राहू दिलेल्या
कधी सुप्तपणे कुरवाळलेल्या
आकांक्षा
अजून आयुष्यावर ओवाळून टाकणे बाकी आहे

केलेल्या चुका
मिळालेल्या सजा
फेकलेले शब्द
झेलले जे भाले
त्यांचा ताळमेळ लागणे अजून बाकी आहे

वळणाना वळणं भेटली
तीच पुन्हा पूर्वीची
थांब अजूनही ..
पुन्हा एकदा
जगणं मनभर पसरणं बाकी आहे

- रश्मी

Tuesday, July 12, 2011

'प्रवाह'

माणसांच्या गर्दीत काल
मी एक विचित्र गोष्ट पाहिली,
डोक्यावरची शिंगे अभिमानाने
मिरवत जाताना ती कुत्सित
हसत होती !
कोण्या एकाच्या मागावरची ती माणसे,
अन कोणी तो 'एकला'
काळाची अजब स्पर्धा लागली होती !
पायात बेड्या घातल्यागत जणू
'तो' जडपणे चालला होता ,
अनभिषिक्त समजल्या जाणाऱ्या
प्रवाहाचा 'तो' काळ होता .
पायाला काटे रुतत होते ,
अविश्वासाचे सुरे पाठीत
खुपसले जात होते ,
'माणूस' म्हणवल्या जाणाऱ्या
पाषाणातून तो चालला होता,
प्रवाह त्याला खेचत होता ,
तो हेंदकाळत त्याला
विरोध करत होता ,
शेवटी .. शेवटी एका पर्वताच्या
कड्याखालून त्याची आर्त
किंकाळी ऐकू आली .

नद्यांनी किती प्रवाह बदलले
वाऱ्याने दशदिशा घुसळल्या
पण आपल्या अस्मिता
आपल्यातच अव्यक्त राहिल्या !!

शतकानु-शतके प्रवाहाच्या विरोधात
जाण्यासाठी त्यांचा जन्म होतो,
आपण मात्र त्यांचे
पुतळे उभे करतो ,
दुरून दंडवत घालण्यासाठी !


-रश्मी

Thursday, December 23, 2010

पिंग पिंग पिंगा रे पिंग पिंग पिंगा

"पिंगणे " हा नवीन शब्द मी परवाच ऐकला. "पिंग पिंग पिंगा रे पिंग पिंग पिंगा" ह्या ओळी मला लगेच आठवल्या.
तुम्हालापण आठवले असेल. पण थांबा. इथे "पिंगणे " हा शब्द "पिंगा घालणे" या अर्थी नाहीये. इथे "पिंगणे" क्रीयापदासारखे चालवायचे. म्हणजे येणे , जाणे, खाणे, पिणे तसे पिंगणे ...पिं..ग..णे...!!
म्हणजे कसे पिंगा हा शब्द घालणे क्रीयापदानंतर पूर्ण पावतो तसे इथे नाहीये .. सुजाण लोकांना समजले असेलच. असो.

आता तुम्ही विचार करत असाल हे आहे तरी काय ?? उम्म्म्मम (विचार करा..विचार करा ?? chatting (ह्याला एखादा मराठी शब्द काय असू शकतो बरे ?) करताना बरेच लोक असे उम्म्म्म लिहितात इंग्रजीमध्ये, विचार करतोय असे दाखवायला, खरे-खोटे देव जाणे ) आता तरी समजले का तुम्हाला ?? पिंगणे म्हणजे इंटरनेट वर बोलताना लोक कसे मधेच ping करतात... तेच ते पिंगणे. आताशा इंटरनेटमुळे कशी भाषेची अशी उत्क्रांती येऊ घातली आहे.

इंटरनेट गप्पा ही नव्या प्रकारची psychology आहे. म्हणजे काही लोक इथे सदैव "पेंगत" असतात. हा शब्द पिंगणेला जवळचा असला तरी विरुद्धार्थी आहे. काही लोका अचानक पणे प्रकट होतात. म्हणजे पिंगतात. असे लोक पण असतात जे काही लोक
नाहीत हे बघून पिंगायला (बघा कसा मस्त वापर होतोय ते ) बसतात आणि तेच लोक दत्त म्हणून समोर आले की काय बोलणार ?? त्यामुळे आजकाल बरेच लोका गुप्तपणे (invisible) राहतात. पण तेही तोट्यात असू शकते म्हणा.. ज्यांना एकमेकांशी बोलायचेय असे दोघेही गुप्त असतील तर मग झाली का नाही गोची ..? मग त्यांनी "पिंग टेस्ट (अजून एक वापर !! :P)" करून बघावी. हम्म्म्म ... म्हणजे उगा आपले पिंगुन बघायचे झाले... आहे का बाबा ? म्हणजे पिंगणे याचा अर्थ एखाद्याचे मायाजालातील घर ठोठावणे असा करू शकतो आपण.

काही लोका शिष्ट पण असतात. उगा कळत नाही, दाखवायचे असते काम करतात का काय नं जाणे . DND च्या पाट्या लिहून ठेवलेल्या असतात.आता DND म्हणजे काय तेवढे विचारू नका. "आम्हाला कृपा करून पिंगू नये आम्ही कामात आहोत " अर्थात do not disturb च्या पाट्या दारावर लावलेल्या! जसे काही यांना कोणी पिंगुच शकत नाही ;) काय करू शकणारेत कोणी लिहूनच गेले दारावर तर. फारतर फार चार दोन शब्द बोलेल आणि लिहील, समोरून काय करणारे.. उगा आपले दाखवायचे ... मग करा की काम गुप्तपणे .... पण नाही. अशा लोकांना पिंगुन त्रास द्यायला मजा येते कधी-कधी. कधी-कधीच. नाहीतर मी म्हणाले म्हणून काही कराल आणि.... समजले नं ...हम्म्म्म !

काही लोका मात्र नेमेची येतो हा पावसाळा याप्रमाणे अगदी रोजच्या रोज पिंगतातच (ह्या शब्दाचे वापर वाढत चालले आहे :) ).
गप्पा लिस्टवर गर्दी असेल तर गजबजलेल्या घरासारखे ते मायाजाल पण खरे खुरे वाटू लागते. बस त्या समोरच्या पडद्यामगे सगळे लोका आहेत..हाकेच्या अंतरावर असल्यासारखे ... ती लाल - हिरव्या दिव्यांची रांग पाहून मन भरून जाते.. दूर देशीच्या, जवळच्या, लांबच्या लोकांचे संमेलनच ! कधी कोणी सहसा नं दिसणारे अचानक भेटतात, अनाहूतपणे पाहुणे घरी आल्यावर कसे होते तसेच. २-४ शब्द पण नाते दृढ करून जातात. साधे hi-hello पण आपल्याला एकमेकांशी जोडून जाते. कधी कोणाशी बोललो नाही तरी ती नावे पाहून भूतकाळातले क्षण उलगडले जातात.. आठवणी हळूच डोकावून जातात .. आणि मग क्षणभर वाटते लाल दिवा दिसतोय ..पण पिंगावे का ?? :) आणि मग परत ती गप्पांची दारे उघडली जातात...

कधी कधी तीच जागा सुनी सुनी पण दिसते ... रविवारी किवा सुट्टीच्या दिवशी सकाळी सकाळी :) ... किवा मग कधी नेहेमी दिसणारे कोणी दिसत नाही आणि मग वाटायला लागते सगळे ठिक तर चालूये नं .. मग चौकशा होतात ... आणि आपण कितीही आरडओरड केली की लोकं एकमेकापासून दूर होत चालले आहेत वगैरे वगैरे.. तरी हे मायाजाल आपल्याला स्थळ-काळापासून मुक्तही करते .. आणि परत परत हे बंध निर्माणही करते .. २-४ शब्द कधी अनेक ओळीत बदलतात समजत नाही.. जगभरातल्या सगळ्या विषयांचे चर्वितचरण केले जातं.. वेळ कसा जातो समजत पण नाही.. दारे बंद करायची वेळ येते आणि सहजच म्हणले जाते " पिंगत जा ग अधून -मधून ... तेवढाच बरे वाटते ."

असा हा पिंगण्याचा उत्सव गेली काही वर्षे चालूये... आता तर दारावर लिहिलेली पाट्या अजून गहिऱ्या होत चालल्या आहेत.. लोकांचा गोतावळा वाढतोच आहे.. हवे तेव्हा एकटे राहावे आणि हवे तेव्हा लोकात मिसळावे .. हा चमत्कार हा पिंगाच करू जाणे. हा पिंग पिंग पिंगा थांबेल असे तर वाटत नाही...

मग तुम्ही कधी पिंगताय आमच्या दारावर ??

Thursday, June 10, 2010

पाउस

रात्र होताहोता नभ झाकोळून यावे
पहिल्या पावसाची चाहूल लागावी
आणि अचानक मध्यरात्री
तीच ती सरींची परिचित गाज
ऐकत जाग यावी
कानात साठवून झोपेतो
त्याच सरींनी जाग यावी.. नव्याने...
ती चाहूल नाविन्याची पुनः पुन्हा
आयुष्यावर पांघरण्यासाठी तरी जगावे आणि मरावे

दूरवर झरझर बरसणाऱ्या धारा
शांत निश्चल वेळी
फक्त रस्त्यावरचा पिवळट दिवा
एक सोबतीला
खिडकीच्या एका चौकोनातून
बघत राहाव्या
आपल्या आयुष्यातील वेड्यावाकड्या रेषा
त्या सलग पडणाऱ्या रेषात
शोधत राहाव्या ... कधी 'डोळेझाक करून'
कधी डोळे मिटून
कधीतरी ह्या खेळाचे साक्षीदार व्हावे
त्या एका खेळासाठी तरी जगावे आणि मरावे

बस्स, एक लहानशी गच्ची किवां छोटेसे अंगण
त्यातून ओघळणाऱ्या पागोळ्या टपटप
हातांची ओंजळ करून त्या भरून घ्याव्या
काठोकाठ .. आणि मग परत त्याचाच
पाऊस करून उधळून टाकावा
चहूकडे .. चिंब त्या तुषारात
अनुभवावी किमया घरातली आणि
घराबाहेरचीपण, एकाच वेळी
सगळे जग एकाच अनुभवाने भारून टाकणाऱ्या
त्या एका किमयेसाठीतरी जगावे आणि मरावे

त्या चिमुकल्याचा पहिलाच पाऊस
भेदरलेल्या नजरेने त्याच्याबरोबर
बघताना आपण पण तसेच व्हावे
जसे पहिले वाहिले काही आश्चर्य
पाहिल्यासारखे
हात पसरून पाहावा तो
पहिल्या थेंबाचा स्पर्श
तसाच असावा अगदी पहिल्यांदा
अनुभवल्यासारखा ..
आपणही मग थाबकावे त्या क्षणी
असे वाटून की हे सगळे आसमंत
कवेत घ्यावे .. कधीच न संपण्यासाठी
ते क्षणिक अमरत्व अनुभवण्यासाठी
तरी एकदा जगावे आणि मरावे.

- रश्मी

Saturday, April 17, 2010

धडा

पूर्वी म्हणजे जोपर्यन्त उच्च शिक्शण सुरू झाले नव्ह्ते अगदी तोपर्यन्त , मी आणि आई बरेचदा सोबत फिरायला जायचो. म्हणजे आता जात नाही असे नाही. पण फारच कमी वेळा. तेव्हा म्हणजे दर आठवडय़ाला अगदी भाजी अणायला मन्डईत जा, काही सामान-सुमान खरेदी असे, साबण म्हणा किंवा काय, चक्कर असायचीच. माणसानी भरुन ओसंडून वाहाणारे रस्ते, रंगीबेरंगी फुगे, चक्रे विकणारे, तुळशीबागेतून जाताना झुंडीने जाणारी बायक-पोरे, कानातले-गळ्यातले , चपला बघत हुज्जत घालणारे दुकानदार आणि त्यांची चोख्नंदळ "गिह्राईकं". आणि जाताना खाऊगल्ली लागे, आणि बवडॆवाला. अगदी काही नाही तरी , खरेदीला येताना जाताना एखादा ग्लास उसाचा रस कधी पदरी पडॆच. नाहीतर कधी मगे लागून भेळ कधी उन्हाळ्य़ात एखादे आईस्क्रिम खात घरी येण्य़ाने सांगता होई.पण अगदीच तेवढा उद्देश नसे. काही धडे पण असतच. म्हणजे मुख्य "बार्गेनिन्ग" करणॆ. अगदी निम्म्याहून खाली सुरू केले की जवळपास निम्म्यावर सुटॆ. दहा ठिकाणी चौकशी करुन मगच खरेदी करायची , मुळात वस्तूचा योग्य भाव आपल्याला ठरवता आला पाहिजे वगैरे वगैरे....
**************
पण नंतर पुढचे अभ्यास सुरु झाले आणि ती मजा कमी होत गेली... तर परवा असा योग आला. फिरायला म्हणून दोघी बाहेर पडलो. छान वाटत होते. इकडे- तिकडॆ बघत गप्प मारत जात होतो. आता दुकाने तशी बदलली आहेत. Malls सारखी. सगळ्या गोष्टी एका ठिकाणी , मस्त लावलेल्या. हवे ते सोयीनुसार घ्यायचे. अगदी imported सुध्धा सर्व मिळते. .... तर मला काहीतरी प्यावेसे वाटत होते. असच एक दुकान लागले आणि मी आत शिरले. दुकान थोडीफार गर्दी होती. खायला पण बरेच काही होते. साधारण दहा एक गोष्टीन्च्या किमती विचारुन मी cold drinks कडे वळले. आणि माझी नजर एका मध्यम आकाराच्या बाटलीवर पडली. ते apple juice होते. कधी बघण्यात आले नव्हते. नविन company दिसते म्हणून म्हणले घेउन तर पाहू. आणि काय मग .. मी बाटली उघडायला सांगितली. आणि माझे लक्श price tag वर पडले. आणि हाय रे दैव.. पूर्ण १७० रुपये !!. मी तिथल्या माणसाला बोलावले.
"अहो, काय किंमत आहे याची ??"
साधे वाचता पण येत नाही असा look देउन तो निर्विकार पणॆ म्हणाला "१७० रुपये".
"काहितरीच काय, साधे पाव लिटर पण नहिये ते."
"अहो, imported आहे ते, अमेरिकेतून येते. " इति दुकानदार.
"मग सांगायची नाही किंमत आधी ?"
"तुम्ही विचारली कुठे ??"
त्याच्या बोलण्य़ात point होता. ते cold drink हातात असताना घशाला कोरड पडली. एक किंमत ऐकून आणि दुसरे साक्शात आमच्या मातोश्री बाहेर उभ्या आहेत पाहून. इतक्या वर्षीचे ख्ररेदीचे धडॆ वाया जाणार, साधी किंमत नाही विचारता आली म्हणून ऐकावे तर लागणारचं होते. पण इतक्याशा त्या सरबताला १७० मोजायचे ?? फारच जिवावर आले होते. शेवटचा प्रयत्न करावा म्हणून विचारले,
"अहो, हे परत घ्या. मी काही प्यायले नाहिये. परत seal करुन टाका "
"असे परत नाही घेता येत madam" त्याला बरेच होते, तो कशाला सोडतो आहे.
किल्ला हातातून गेलाच होता. त्या १७० मध्ये मी अजून काय काय विकत घेउ शकले असते ते डोळ्यासमोर
येत होते. ५ रुपयाचा वडा पण परवडला असता. पण आता काय उपयोग होता.
एवढे होते तो आई आत आली. इतक्य़ा वेळ बाहेरुन पाहात होती. तिला संशय आला असावा, बराच वेळ
मी दुकानदाराशी बोलत होते. काय घडले ते ऐकून माझ्याकडॆ तिने एक कटाक्श टाकला. मी समजायचे ते समजले.
निमूट्पणे पैसे चुकते करुन बाहेर पडलो. कान ऐकायचे काम करत होते. मी कसनुसा चेहरा केला आणि
म्हणाले "यापुढॆ कानाला खडा. किंमत विचारल्याशिवाय काही घेणार नाही. "
माझे डोळे उघडले. खरचं उघडले.
**************
मी खो खो करुन हसत सुटले. आई समोर येउन म्हणाली "अगं, काय झाले एवढे हसयाला? "
मी तिला स्वप्न सांगितले. दोघी हसत बसलो. मग म्हणाली "बरयं चांगला धडा मिळाला"
तर हे असे आहे, आम्हाला कधी नव्हे ती स्वप्ने पडतात, आणि त्यात पण शिकावेच लागते. एका ज्योतिषाने
तू शिकणारचं आयुष्यभर, योगचं तसा, असे सान्गितले होते. पण तो इतका वाईट्ट असेल असे वाटले नव्ह्ते.
आता काय सान्गायचे महाराजा, धडॆ मिळण्यातून खरया आयुष्यात नाहिच पण स्वप्नात तरी सुटका व्हावी..
बाकी पैसे वाया न जाता "धडा" मिळाला हेही नसे थोडके, नाही का ??


टिप : सत्य घटनेवर आधारित. :)