रात्र होताहोता नभ झाकोळून यावे
पहिल्या पावसाची चाहूल लागावी
आणि अचानक मध्यरात्री
तीच ती सरींची परिचित गाज
ऐकत जाग यावी
कानात साठवून झोपेतो
त्याच सरींनी जाग यावी.. नव्याने...
ती चाहूल नाविन्याची पुनः पुन्हा
आयुष्यावर पांघरण्यासाठी तरी जगावे आणि मरावे
दूरवर झरझर बरसणाऱ्या धारा
शांत निश्चल वेळी
फक्त रस्त्यावरचा पिवळट दिवा
एक सोबतीला
खिडकीच्या एका चौकोनातून
बघत राहाव्या
आपल्या आयुष्यातील वेड्यावाकड्या रेषा
त्या सलग पडणाऱ्या रेषात
शोधत राहाव्या ... कधी 'डोळेझाक करून'
कधी डोळे मिटून
कधीतरी ह्या खेळाचे साक्षीदार व्हावे
त्या एका खेळासाठी तरी जगावे आणि मरावे
बस्स, एक लहानशी गच्ची किवां छोटेसे अंगण
त्यातून ओघळणाऱ्या पागोळ्या टपटप
हातांची ओंजळ करून त्या भरून घ्याव्या
काठोकाठ .. आणि मग परत त्याचाच
पाऊस करून उधळून टाकावा
चहूकडे .. चिंब त्या तुषारात
अनुभवावी किमया घरातली आणि
घराबाहेरचीपण, एकाच वेळी
सगळे जग एकाच अनुभवाने भारून टाकणाऱ्या
त्या एका किमयेसाठीतरी जगावे आणि मरावे
त्या चिमुकल्याचा पहिलाच पाऊस
भेदरलेल्या नजरेने त्याच्याबरोबर
बघताना आपण पण तसेच व्हावे
जसे पहिले वाहिले काही आश्चर्य
पाहिल्यासारखे
हात पसरून पाहावा तो
पहिल्या थेंबाचा स्पर्श
तसाच असावा अगदी पहिल्यांदा
अनुभवल्यासारखा ..
आपणही मग थाबकावे त्या क्षणी
असे वाटून की हे सगळे आसमंत
कवेत घ्यावे .. कधीच न संपण्यासाठी
ते क्षणिक अमरत्व अनुभवण्यासाठी
तरी एकदा जगावे आणि मरावे.
- रश्मी
khup chan !!!!
ReplyDeletemast
ReplyDeletemast ahe..
ReplyDeletekhup sahi.......
ReplyDeleteKhoopach chhan aahe....ekadam lahan houn pavasat bhijalyasarakh vatal vachatana... :) khoopach mast!
ReplyDelete